यावल महाविद्यालयात महापुरुषांची जयंती साजरी

"यावल महाविद्यालयात महापुरुषांची जयंती साजरी"
यावल (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकच व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री या महापुरुषांची जयंती ऑनलाइन साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ. सौ. संध्या सोनवणे यांनी भूषविले.
प्रारंभी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. व्ही. बी. पाटील यांनी 'भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीजींचे योगदान' या विषयावर आपले विचार व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणात असे विशद केले की, महात्मा गांधीजींनी अन्यायाच्या प्रतिकार सत्याग्रह व अहिंसेच्या मार्गाने कसा करता येवू शकतो याची शिकवण संपूर्ण जगाला दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन व कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की या थोर महापुरुषांनी आपल्या जीवनात प्रेम, सत्य, अहिंसा, संयम, मानवता या जीवनमूल्यांची आजीवन जपवणूक केली.
सदर कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार व प्रा. संजय पाटील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व अनेक विद्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. सौ. सुधा खराटे यांनी तर आभार प्रदर्शन इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. एस. कापडे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. व्ही. पावरा व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एच. जी भंगाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे केले.